बैलपोळा.
बैलपोळा
![]() |
बैलपोळा |
श्रावण महिन्यात खूप वेगवेगळे सण येत असतात. या महिन्यात सणांची खूप रेलचेल सुरू असते आणि श्रावण महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांचा सर्जा-राजाचा सण म्हणजेच “ बैलपोळा “ सण येतो .
शेतकरी राजाला तर ह्या सणाची खूप आतुरता असतेच आणि त्याच बरोबर बऱ्याच जणांना उत्सुकता हि लागलेली असते कि 2022 मध्ये पोळा कधी आहे . चला मग बघुयात 2022 मध्ये कोणत्या दिवशी हा सण येतोय .
खरं म्हणजे सर्व जगाचे पोट ज्या बळीराजावर अवलंबून असते त्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण खूप महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो .
वर्षभर शेतीकामाला मदतनीस म्हणून उभा राहणारा शेतकऱ्या बरोबर राहणारा सर्जा – राजा ( बैल ) याच्या विना शेतकऱ्यांचे काम पूर्ण होत नाही अशा या रिंगी – शिंगी , ढवळा – पवळा , सर्जा- राजा व अशी प्रेमाने बरीचशी ठेवलेली नावे बैलाची असतात .
अशा या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण वर्षातून एकदा येतो. व शेतकरी राजा हा सण खूप आनंदाने व उत्साहाने साजरी करतो .
बैलपोळा सण कसा साजरा करतात ? | व बैल पोळा सजावट ?
पोळा सणाच्या आदल्या दिवशी सकाळी बैलांना रितसर आमंत्रण दिले जाते.“आज आवतण घ्या,उद्या जेवायला या“ असे म्हणून आमंत्रण दिले जाते.
दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन त्यांची छान आंघोळ घातली जाते . त्यानंतर त्यांना गोठ्यात, ( वाड्यात ) आणतात. आणि चारा पाणी खाऊ घालतात.
सणाच्या दिवशी बैलांना दिवसभर विश्रांती दिली जाते म्हणजे वर्षातला हा एकच दिवस असतो या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही.
अंघोळ झाल्यानंतर त्यांच्या शिंगांना रंग लावले जातात व त्यांच्या खांद्यांना तुपाने किंवा तेलाने हळद घालून शेक दिला जातो ( शेकतात ) याला ( खांदा शेक किंवा खांद बैली ) असेही म्हणतात .
त्यानंतर त्यांच्या अंगावर गेरूने किंवा रंगाने नक्षीकाम, रंगरंगोटी व हवे तसे रंगविले जाते .त्यानंतर त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली शाल घालतात. नंतर डोक्याला बाशिंगे, गळ्यात कवड्यांची माळ आणि घुंगरांची माळ घातली जाते .
त्याचबरोबर नवीन वेसण ,नवा कासरा ( आवरायची दोरी ) व पायात चांदीचे वा करदोड्यांचे तोडे घालतात . प्रत्येक शेतकरी त्याला जमेल तसे बैलाला सजवायचा पूर्ण प्रयत्न करतो . त्यानंतर त्याला नैवद्य म्हणून
(खायला) गोड पुरणाची पोळी व इतर छान बनवलेले जेवण नैवद्य म्हणून देतात.
त्याच बरोबर “ बैलगडी” म्हणजे बैलाची निगा राखणाऱ्या घर गड्यालाही नवीन कपडे दिले जातात. व त्यांनाही जेवणाचे आमंत्रण दिलेले असते .
गावाच्या सीमेजवळ मिरवणूक असते त्या मिरवणुकीत सर्व बैलजोड्या ,वाजंत्री, ढोल ,ताशे वाजवत एकाठिकाणी आणल्या जातात व तिथे मिरवणुकीत भाग घेतात .
त्यानंतर ज्याला गावाचा मान असतो असा पाटील किंवा गावातील मोठा व्यक्ती जो असतो तो तोरण तोडतो व पोळा फुटतो . काही ठिकाणी बैलांची शर्यत लावून बैलान कडूनच तोरण तोडले जाते त्याला पोळा फुटला असे म्हणतात .
त्या दिवशी संपूर्ण गावातील घरांना देखील आंब्याच्या पानांची तोरणे बांधली जातात. पोळा फुटल्यानंतर बैलाला घेऊन गावात फिरतात. प्रत्येकाच्या दारापुढे खाटेवर बैलांसाठी धान्य ठेवलेले असते .
जेव्हा बैल राख्या किंवा मुले बैलाला घेऊन येतात, तेव्हा बैलांच्या पायावर पाणी टाकतात व पूजा करतात. व त्याला खाटेवर ठेवलेले धान्य व नैवद्य खायला घालतात. त्याच खाटेखाली ( पलंगाखाली ) पाटावर मातीचे ही बैल ठेवलेले असतात व त्यांची ही पूजा केली जाते.
त्यानंतर जो बैल घेऊन आला आहे त्या व्यक्तीला नारळ दिले जाते किंवा पैसे दिले जातात व त्याचीही पूजा (औक्षण) केले जाते.
अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी वर्षभर राबणाऱ्या प्रत्येक कामात सोबत असणारा, धान्यासाठी वर्षभर कष्ट करणारा असा शेतकऱ्यांचा खरा सोबती, सखा असतो. व याच बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी खूप आनंदाने व उत्साहाने बैलपोळा सण साजरी करतात. व प्राण्यांवरील असलेले प्रेम व्यक्त करतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please Do Not any Spam link in Comment Box
Thanks for come here 🤗
Visit Again ☺️